नवी दिल्ली – ज्योतिरादित्य शिंदे यांची कॉंग्रेसमध्ये निर्णायक भूमिका असायची. मात्र आज भारतीय जनता पक्षात ते मागच्या सीटवर बसले आहेत, अशी टीका कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. युवक कॉंग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी एकप्रकारे शिंदे यांनी पक्षाची साथ सोडल्याच्या प्रकाराबद्दल आपली खंतही व्यक्त केली.
राहुल म्हणाले की ज्योतिरादित्य कॉंग्रेसमध्ये होते तेव्हा ते आमच्या शेजारी बसायचे. त्यांची भूमिका निर्णायक असायची. मात्र आज ते कुठे बसले आहेत? भाजपने त्यांना मागच्या सीटवर बसवले आहे. शिंदे जेव्हा माझ्याकडे आले होते, तेव्हा मी त्यांना आणखी कष्ट घ्या, येणाऱ्या काळात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री व्हाल, असे त्यांना सांगितल्याची माहितीही राहुल यांनी यावेळी दिली.
कॉंग्रेस पक्ष हा एक विशाल सागर आहे अन त्याचे दरवाजे सगळ्यांसाठी खुले आहेत. कोणाला या पक्षातून येण्यापासून कोणीही रोखणार नाही. तसेच कॉंग्रेसच्या विचारधारेवर ज्यांचा विश्वास नाही त्यांनाही पक्षातून बाहेर जाण्यापासून कोणी रोखणार नाही, असेही ते म्हणाले.