नवी दिल्ली – देशातील इंधन दरवाढीमुळे लोकांना मोठा भार सहन करावा लागत असल्याने या दरवाढीच्या विरोधात आज विरोधी पक्ष सदस्यांनी राज्यसभेत मोठा गदारोळ केल्याने आज सुरूवातीच्या काळात दोन वेळा आणि नंतर पुर्ण दिवसभरासाठी कामकाज तहकुब करावे लागले आहे.
सुरूवातीला 11 वाजपर्यंत, नंतर 1 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी हे कामकाज तहकुब करावे लागले. विरोधकांनी या विषयावरील आपल्या भावना अत्यंत तीव्र स्वरूपात उपस्थित करून अन्य कामकाज होऊ देण्यास विरोध केला.
पेट्रोल, डिझेल, आणि एलपीजी सिलिंडर यांच्या किंमती अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढल्या असून त्यावर त्वरीत चर्चा घेण्याची मागणी विरोधी सदस्यांनी केली. पण पीठासीन अधिकाऱ्यांनी त्याला नकार दिल्याने सदस्यांनी गदारोळ केला.