जलालाबाद, – पूर्व अफगाणिस्तानात मंगळवारी स्थानिक माध्यमांसाठी काम करणाऱ्या तीन महिलांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. अफगाणिस्तानमध्ये पत्रकार आणि प्रसिद्धी संस्थांसाठी काम करणाऱ्यांची हत्या होण्याचे प्रमाण गेल्या काही काळात वाढले आहे. याची दखल आंतरराष्ट्रीय समुदायाला घेणे गरजेचे आहे, असे स्थानिक कार्यकर्त्याने म्हटले आहे.
जलालाबाद शहरातील एनिकास रेडिओ व टीव्ही येथे काम करणाऱ्या महिला कामावरून घरी जात होत्या. त्यावेळी झालेल्या दोन वेगळ्या हल्ल्यात त्या ठार झाल्या, असे या प्रकाशन संस्थेचे व्यवस्थापक शोकोरुल्ला पासून यांनी सांगितले. या महिला परदेशी कार्यक्रमांसाठी व्हॉइस-ओव्हर करणाऱ्या विभागात काम करत होत्या. या हल्ल्यात चौथी महिला जखमी झाली आणि तिला रुग्णालयात नेण्यात आले, असे प्रांतीय रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.
एनिकॅससमवेत टिव्ही व रेडिओ प्रेझेंटर म्हणून काम करणाऱ्या 26 वर्षीय मलालाई मैवंद यांना त्याच प्रकारे डिसेंबरमध्ये ठार मारण्यात आले होते. इस्लामिक स्टेट गटाशी संलग्न संघटनेने त्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती, परंतु मंगळवारी झालेल्या हल्ल्याबाबत दावा करणारे निवेदन या संघटनेने प्रसिद्ध केलेले नाही. एका घटनास्थळी एका तालिबानी मास्टर माईंडला पकडण्यात आले असून त्याच्याकडे सायलेन्सर लावलेले पिस्तुल आढळून आले आहे, असे नांगरार प्रांताचे पोलिस प्रमुख मेजर जनरल जुमा गुल हेमात यांनी सांगितले.