नवी दिल्ली – करोना लसीकरणाला गती देण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, लसीकरणासाठी निश्चित करण्यात आलेली वेळेची मर्यादा हटवण्यात आली आहे. त्यामुळे देशातील जनतेसाठी लसीकरणाची सुविधा संपूर्ण चोवीस तास उपलब्ध राहणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी बुधवारी ट्विटरवरून संबंधित माहिती दिली. देशातील जनतेच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या वेळेच्या किमतीची जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. त्यातून लसीकरणाची सुविधा पूर्ण वेळ उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशा आशयाचे ट्विट वर्धन यांनी केले. याआधी लसीकरणासाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 अशी वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र, ती वेळ वाढवून देण्याचे सूतोवाच केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले. लसीकरणासाठी निश्चित करण्यात आलेली रूग्णालये वेळ ठरवू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.