नवी दिल्ली – केंद्र सरकारने नव्याने लागू केलेले कृषी कायदे मागे घ्यावे या प्रमुख मागणीसह शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडून बसलेत. शेतकरी आंदोलनाची दखल आता जागतिक पातळीवर घेण्यात येत असून पॉप स्टार रिहाना व पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली आहे. मात्र या दोन्ही सेलिब्रिटींनी मांडलेल्या भूमिकेनंतर भारतीय क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनी ‘भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये ढवळाढवळ करू नये’ अशी एकमुखी भूमिका मांडली.
सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने देखील अशीच भूमिका मांडली होती. मात्र यानंतर सचिनला सोशल मीडियावर मोठा विरोध करण्यात येतोय. शेतकरी आंदोलनाबाबत इतक्या दिवसांपासून शांत बसलेला सचिन रिहाना व ग्रेटाच्या ट्विटनंतर जागा झाल्याने नेटकरी चांगलेच भडकलेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सचिनला मोलाचा सल्ला दिला आहे.
आज पुण्यामध्ये शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सचिन व लता मंगेशकर यांनी मांडलेल्या भूमिकेबाबत विचारण्यात आले. यावर बोलताना पवार यांनी, ““लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकरांच्या प्रतिक्रियांवर अनेक सामान्य लोक तीव्र पणे होत आहेत. आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी असा माझा सचिनला सल्ला राहील” असं म्हंटल.
सहानुभूती मिळते. हे खरं तर चांगलं नाही
“इतके दिवस कष्टकरी वर्ग रस्त्यावर बसला आहे. त्याचा विचार करायला पाहिजे. त्याचाच प्रतिसाद आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. सहानुभूती मिळते. हे खरं तर चांगलं नाही. आपले पंतप्रधान तिकडे बोलले होते. आता त्यांची प्रतिक्रिया येत आहे. शेतकऱ्यांना कधी खलिस्तानी म्हणतात कधी अतिरेकी म्हणतात. शेतकरी आंदोलनाला बदनाम करत आहेत” असा आरोपही शरद पवार यांनी केला.