शहरात 10.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद
पुणे – एकीकडे किमान तापमानाचा पारा घसरल्याने जाणवणारी थंडी, तर दुसरीकडे सातत्याने वाढणाऱ्या कमाल तापमानामुळे जाणवणारा उन्हाचा चटका असे संमिश्र वातावरण शहरात सध्या अनुभवायला मिळत आहे.
पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमधील किमान तापमानात लक्षणीय घट झाल्याचे हवामान विभागाच्या नोंदीतून समोर आले आहे. गुरुवारी (दि.4) राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद पुणे येथे 10.3 अंश सेल्सिअस इतकी नोंदवली आहे. त्यापाठोपाठ नागपूर येथे किमान 10.7 अंश सेल्सिअस, तर अन्य ठिकाणी 11 ते 14 अंश सेल्सिअसच्यादरम्यान किमान तापमान नोंदविले गेले आहे. त्यामुळे याठिकाणी हवेत गारवा वाढल्याचे जाणवले.
मात्र, त्याचवेळी पुणे शहर परिसरात सकाळी आणि संध्याकाळी गारवा तर दुपारी कडक ऊन अनुभवायला मिळाले. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरातील किमान तापमानात घट होत असतानाच, कमाल तापमानात मात्र वाढ होत असल्याचे विभागाच्या नोंदीतून दिसून येत आहे.
शहरात मंगळवारी (दि.2) कमाल तापमान 29.7 अंश सेल्सिअस इतके होते, तर बुधवारी (दि.3) ते 30.1 अंश सेल्सिअस इतके नोंदवले होते. गुरुवारी शहरात 30.7 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली.