“नगर अर्बन’ची 22 कोटींची फसवणूक : चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पिंपरी/नगर – नगर अर्बन बॅंकेच्या पिंपरी चिंचवड (जि. पुणे) शाखेत 22 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपावरून कर्जदार कंपनीच्या संचालक मंडळासह नगर अर्बन बॅंकेचे माजी अध्यक्ष तथा माजी खासदार दिलीप गांधी, तत्कालीन संचालक मंडळावर फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बॅंकेचे तत्कालीन संचालक मंडळ व संबंधित कर्जदारांसह बॅंकेची कर्ज उपसमिती या घोटाळ्यास जबाबदार असल्याची फिर्याद बॅंकेचे प्रमुख व्यवस्थापक महादेव साळवे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
कर्जदार बबन चव्हाण, वंदना चव्हाण, यज्ञेश चव्हाण, तसेच मंजूदेवी हरिमोहन प्रसाद, रामचंद्र तांबिले, (सर्व रा. चिंचवड), अभिजित नाथा घुले, (रा. बुरुडगाव रोड, नगर) यांच्यासह बॅंकेच्या कर्ज उपसमितीमधील सदस्य व नगर अर्बन बॅंकेच्या तत्कालीन संचालक मंडळाचे सदस्य यांच्या विरुद्ध चिंचवड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.