नवी दिल्ली – बिहार कॉंग्रेसचे प्रभारी शक्तिसिंह गोहील यांच्याकडील ही जबाबदारी त्यांच्या विनंतीनुसार काढून घेण्यात आली असून गोहील यांच्या जागी भक्तचरण दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोहील हे गेली तीन वर्षे बिहारचे प्रभारी म्हणून काम पहात होते. पण त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव ही जबाबदारी सोडली आहे. भक्तचरण दास हे कॉंग्रेसचे ओडिशातील नेते असून ते माजी मंत्रीही आहेत.
बिहार मध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला अपेक्षित यश मिळू शकले नाही. कॉंग्रेसने राजद व अन्य मित्रांच्या आघाडीत 70 जागा मागून घेतल्या होत्या पण त्यांना त्यातील केवळ 19 जागाच जिंकता आल्या आहेत.
कॉंग्रेसने इतक्या जागा मागून घेतल्या नसत्या तर राजदच्या नेतृत्वाखालील आघाडी सत्तेवर येऊ शकली असती असाही दावा केला जात असल्याने कॉंग्रेस मधील खदखद विकोपाला जात आहे. पक्षाचे काही सदस्य पक्षांतरही करण्याच्या मनस्थितीत आहेत असे सांगितले जात आहे.
या पार्श्वभूमीवर तेथे तातडीने नवीन प्रभारी नेमण्यात आले आहेत.