जिनिव्हा – करोना रोगाचे मूळ शोधण्यासाठी तज्ज्ञांचे जे पथक चीनला जाणार होते त्या पथकाला चीनने अजून अनुमती न दिल्याने जागतिक आरोग्य संघटनेने चीनवर नाराजी व्यक्त केली आहे.
या संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी म्हटले आहे की जे तज्ज्ञ जागतिक आरोग्य संघटना आणि चीन यांच्या संमतीने चीनकडे जाणार होते, त्यासाठी ते आपल्या मायदेशातून निघाले असताना अजून चीनने त्यांना मंजुरी दिलेली नाही. ही निराशाजनक बातमी आहे.
चीनच्या या अडेलपणामुळे तज्ज्ञांना आयत्यावेळी आपला दौरा रद्द करावा लागला आहे. ही चांगली स्थिती नाहीं अशा शब्दात जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी नाराजी व्यक्त केली आहे, पण चीनने मात्र अजून त्यावर आपला खुलासा केलेला नाही.
मुळात चीनला जर अशी अनुमतीच द्यायची नव्हती तर त्यासाठी त्यांनी आधी तयारी दर्शवायचे काही कारण नव्हते असे काही संबंधीतांचे म्हणणे आहे. दरम्यान, चीनच्या या भूमिकेमुळे नक्की चीनला करोनाबाबतची कोणती माहिती जगासमोर येऊ द्यायची नाहीये असा प्रश्न उपस्थित होतोय.