कोलकाता – हदयविकाराचा झटका आल्यामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आलेला भारतीय किक्रेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची प्रकृती आता चांगली सुधारली असून त्याला उद्या गुरूवारी रूग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे.
त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्याला आजच रूग्णालयातून घरी सोडण्यात येणार होते पण त्याच्या इच्छेनुसार त्याला अजून तेथे एक दिवस तेथे ठेऊन घेतले जाणार आहे. ते आता क्लिनिकली फीट असून ते त्यांचा नेहमीचा आहारही घेऊ लागले आहेत असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ रूपाली बसू यांनी सांगितले.
त्यांच्या हदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या तीन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आढळले होते. आता ते दूर करण्यात आले आहेत. गांगुली हे राजकारणात प्रवेश करून भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून त्यांना पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पुढे केले जाण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने ते अचानक आजारी पडण्याच्या घटनेची बरीच चर्चा झाली आहे.