पुणे – रिक्षा चालकास कट मारल्याचा जाब विचारणे एक तरुणास चांगलेच महागात पडले. चिडलेल्या रिक्षा चालकाने रस्त्यावरील दगड फेकून मारल्याने तरुणाचे समोरचे दोन दात पडले. याप्रकरणी तोहीब शेख (रा.लोहगाव) याच्याविरुध्द विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी सुमित शेळकंदे(21,रा.धानोरी) हा त्याच्या दुचाकीवरुन मित्राचे उसने घेतलेले पैसे देण्यासाठी जात होता. धानोरी लोहगाव रस्त्यावर शेखच्या रिक्षाने त्याला कट मारल्याने तो दुचाकीसह खाली पडला. याचा जाब सुमितने शेखला विचारला.
तुला रिक्षा नीट चालवता येत नाही का? अशी विचारणा त्याने केली. याचा राग मनात येऊन शेखने रस्त्यात पडलेला दगड सुमितला फेकून मारला. यामध्ये सुमितचे समोरचे दोन दात पडले. याप्रकरणी पोलिस उप निरीक्षक लहू सातपुते पुढील तपास करत आहेत.