पुणे- झाडाचा कचरा अंगणात पडल्याच्या वादातून शेजारी रहाणाऱ्या दोन कुटूंबात तुफान हाणामारी झाली. यामध्ये कोयता, लोखंडी रॉड आणी काठीचा वापर करण्यात आला. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी रजनिकांत चंदनशिवे(65,रा.आदर्श कॉलनी, टिंगणेनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनूसार पंकज येरवा आणी त्याच्या मोठ्या भावावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या शेजारी रहाणाऱ्या येरवा यांच्या कुटूंबाच्या घरात मोठी झाडे लावण्यात आली आहेत. यातील एका झाडाचा कचरा चंदनशिवे यांच्या दारात पडतो. हा कचारा चंदनशिवे यांच्या वहिणीने येरवा यांना काढण्यास सांगितले होते. हा कचरा काढल्यानंतर येरवा तो जाळू लागले.
वहिणीने त्यांना कचरा जाळू नका असे सांगितल्याने येरवा यांनी त्यांना शिवीगाळ केली. या शिवीगाळीची विचारणा करण्यास चंदनशिवे गेले असता, त्यांना येरवा कुटूंबातील दोघा सदस्यांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. तर पंकज येरवा(48) यांनी दिलेल्या तक्रारीनूसार अनिकेत चंदनशिवे(32) व रजनिकांत चंदनशिवे(65) यांच्याविरुध्द मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
येरवा यांच्या तक्रारीनूसार त्यांच्या घरातील झाडाचा कचरा चंदनशिवे यांच्या घरात पडत असतो, तो उचलला जात नसल्याने चंदनशिवे यांनी शिवीगाळ करुन कोयता व काठी घेत गाडीचा काच फोडली. यानंतर पंकज व त्यांच्या मुलाच्या पायावर मारुन त्यांना जखमी केले. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक नरळे करत आहेत.