देशभरातील करोना बाधित रुग्णांची संख्या 56
नवी दिल्ली – केरळमध्ये करोना रुग्णांच्या संख्येमध्ये आणखी 6 नवीन रुग्णांची भर पडली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झालेल्या आणखी 6 रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना या वृत्ताचे समर्थन केले आहे. करोना विषाणूची लागण झाल्याची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या सहा रुग्णांपैकी चार रूग्ण कोट्टायमच्या मेडिकल कॉलेजच्या विलगीकरन वॉर्डमध्ये दाखल झाले आहेत, तर इतर दोन जण पठाणमथिट्टा जिल्ह्यातील कोझेनचेरी येथील तालुका रुग्णालयात आहेत. त्यामुळे केरळमधील करोना बाधित रुग्णांची संख्या आता 12 झाली आहे. कोझेनचेरीतील दोन रुग्ण इटलीहून परत आलेल्या आणि पॉझिटिव्ह चाचणी घेतलेल्या पाच जणांच्या कुटुंबाशी थेट संपर्कात आले आहेत.
मार्चमध्ये सीबीएसई, आयसीएसई आणि वर्ग 1 ते 7 साठी राज्यातील शाळा बंद राहतील. मार्चमध्ये महाविद्यालयेही बंद ठेवण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्री विजयन यांनी सांगितले.
तर शेजारील कर्नाटकमध्ये करोनाची बाधा झालेल्या 3 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. कर्नाटकात बेंगळुरू इथून 3 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद मंगळवारी झाली, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या तीन नवीन प्रकरणांमध्ये एक 50 वर्षीय वृद्ध असून नुकताच अमेरिका आणि लंडनला भेट दिली होती आणि सोमवारी सॉफ्टवेअर अभियंताची पत्नी व मुलीची करोना विषयक चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्या राज्यातील करोना बाधित रुग्णांच्या संख्येला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अद्याप अधिकृत मान्यता मिळालेली नाही. जर ही आकडेवारी अधिकृत मानली गेली तर देशातील करोनाग्रस्तांची अधिकृत आकडेवारी 56 होईल.