नैरोबी : सोमालिया येथे नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात एक वरिष्ठ अल-शबाबचा कमांडर ठार झाला, असे अमेरिका आफ्रिकन कमांड (आफ्रिकॉम) च्या संचालकांनी रविवारी सांगितले.
बशीर मोहम्मद महमौद हा सोमालियातील दहशतवाद तसेच केनियात हल्ले करण्यासाठी जबाबदार असलेला एक वरिष्ठ ऑपरेशनल म्होरक्या होता.
तो या हवाई हल्ल्यात मारला गेला, असे “आफ्रिकॉम’चे संचालक कर्नल ख्रिस्तोफर कर्न्स यांनी सांगितले. गेल्या दशकभरापासून तो दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होता, असेही कर्न्स यांनी सांगितले.
दक्षिण-पूर्व केनियामधील अमेरिका-केनियाच्या सैन्य तळावर जानेवारीत झालेल्या हल्ल्यात बशीरचादेखील सहभाग असल्याचा संशय होता. या हल्ल्यात तीन अमेरिकन ठार झाले होते.
आफ्रिकेत अमेरिकेच्या लॅंड फोर्सेसचे कमांडर जनरल रॉजर क्लोटीअर यांनी अल-शबाबला नुकताच खंडातील सर्वात मोठा धोका असल्याचे घोषित केले होते. आफ्रिकेत अमेरिकेच्या कारवाईवर काही विश्लेषकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.