शिरुर (प्रतिनिधी) – कारेगाव तालुका शिरूर येथील 80 वर्षीय वृद्ध महिलेचा अखेर करोना संसर्गाने निधन झाल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली.
महिलेवर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आहे. कारेगाव येथील महिलेच्या मृत्यूमुळे शिरूर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नऊ तारखेला या वृद्ध महिलेला शिरूर जवळील बाबुराव नगर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर दहा तारखेला नगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर 13 तारखेला या महिलेला पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे संशय आल्याने या महिलेची करोना टेस्ट करण्यात आली. यात ही वृद्ध महिला पॉझिटिव्ह निघाली होती. पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना आज दिनांक 20 मे रोजी या वृद्ध महिलेचे निधन झाले.
दरम्यान, वृद्ध महिलेचे 14 नातेवाईकांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर या महिलेने सर्वप्रथम शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. तेथील डॉक्टरसह 18 कर्मचारी व पाच पेशंट असे 23 जणाचे अहवालही निगेटिव्ह आले होते. यामुळे कारेगाव, शिरूर व शिरूर पंचक्रोशी परिसर सुरक्षित आहे. तर ही वृद्ध महिला राहत असलेला कारेगाव येथील काही परिसर महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करून प्रतिबंधित केला आहे. या महिलेला नक्की कोरोना संसर्ग कुठे झाला, याबाबत ठोस माहिती मिळाली नसून हा संसर्ग हॉस्पिटलमध्येच झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.