नवी दिल्ली- जगातल्या प्रत्येकाला करोनाची लस देण्यासाठी 2024 सालचा अखेर उजाडेल असे वक्तव्य सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.
आता त्यांच्याच म्हणण्यानुसार भारतातील प्रत्येक व्यक्तीला ही लस द्यायची झाल्यास 80 हजार कोटी रूपये खर्च येणार आहे. लशीच्या खरेदी आणि वितरणासाठी पुढच्या वर्षभरात हे पैसे लागणार असून भारत सरकारकडे एवढे पैसे आहेत का, हा प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ऑक्स्फर्ड आणि ऍस्ट्राझेनेकाच्या लशीची तिसरी चाचणी सीरमने सुरू केली आहे. पुण्यातील काही हॉस्पिटल्सची याकरता निवड करण्यात आली असून या टप्प्यात 150ते 200 जणांना लशीचा डोस दिला जाणार आहे.
दरम्यान, नोव्हाव्हॅक्सकडून तयार केल्या जाणाऱ्या करोना लशीच्या चाचण्याही सीरमकडूनच केल्या जाणार असून पुढच्या महिन्यात त्या घेण्यास सीरम सज्ज झाल्याचेही सांगण्यात येत आहे.