सांगली – सांगली जिल्ह्यातील 94 वर्षीय महिलेने करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मिरज येथील रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या या आजीबाईंना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी डॉक्टर आणि नर्स यांच्याकडून टाळ्या वाजवून शुभेच्छा देत आजीला डिस्चार्ज देण्यात आला. ही महिला करोनावर मात करणारी राज्यातील सर्वात वयोवृद्ध रुग्ण ठरली आहे.
सांगली जिल्ह्यातील कामेरी येथील करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 94 वर्षांच्या आजीला करोनाची लागण झाली होती. या वृद्ध महिलेला मिरजेतील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. या महिलेवर शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय स्टाफकडून योग्य प्रकारे उपचार करण्यात आले.
आयसोलेशन कक्षात दाखल केल्यापासून 14 दिवसानंतर आजीची करोना चाचणी घेण्यात आली. दोन टेस्टमध्ये तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. यानंतर महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापूर्वी मिरजेतील करोनाच्या रुग्णालयातून दोन वर्षाच्या बाळावर करोनावर यशस्वी उपचार करुन त्यालाही करोनामुक्त करण्यात आले आहे.
दुसरीकडे, मुंबईतील 93 वर्षीय महिलेनेही करोनावर मात केली. माझगावची रहिवासी असलेल्या आजीबाईना 17 एप्रिलला सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी या महिलेला हायपरटेन्शन आणि अशक्तपणासारख्या व्याधीही होत्या.