नवी दिल्ली – भारत आणि मालदिवदरम्यान आज 6 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायबर सुरक्षेसह अन्य क्षेत्रांमधील सहकार्यासाठी हे करार मालदिवबरोबर करण्यात आले आहेत. मालदिवमधील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्यापूर्ततेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 दशलक्ष डॉलरची मदत मालदिवला देण्याची घोषणाही यावेळी केली.
भारत दौऱ्यावर आलेले मालदिवचे अध्यक्ष इब्राहिम सोलिह यांच्याबरोबर पंतप्रधान मोदी यांची सविस्तर चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मालदिवच्या सुरक्षा दलांसाठी 24 वाहने आणि एक बोटदेखील देण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. याशिवाय मालदिवच्या 61 बेटांवरील पोलीस दलासाठीच्या पायाभूत सुविधा उभारण्याची घोषणाही मोदींनी केली. मालदिवच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारत आतापर्यंत नेहमीच अग्रेसर राहिला आहे. यापुढेही अग्रेसर राहिल, असेही मोदी यांनी सांगितले.
दोन्ही बाजूंमधील सहा करार मालदीवमध्ये क्षमता निर्माण, सायबर सुरक्षा, गृहनिर्माण, आपत्ती व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये सहकार्याला मदत करतील. चीनच्या धोक्याच्या पार्श्वभुमीवर मालदिवबरोबर संरक्षण आणि सागरी सुरक्षेच्या सहकार्याचा करार केला गेला आहे. चार दिवसांच्या बारत दौऱ्याबद्दल आलेले मालदिवचे अध्यक्ष सालिह यांनी भारताबरोबरचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्यास कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगितले.