पुणे – शहरासह जिल्ह्यात शनिवारी करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम पार पडली. त्यानंतर काही व्यक्तींना ताप येणे, मळमळ, चक्कर येणे अशा किरकोळ 58 तक्रारी आढळून आल्या. मात्र, सर्व लाभार्थींची प्रकृती ठीक असून, कोणालाही रूग्णालयात भरती करण्याची वेळ आली नाही.
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 31 केंद्रावर लसीकरण झाले. त्या लसीकरणानंतर शनिवार, रविवारी दोन दिवसांमध्ये किरकोळ स्वरुपाच्या तक्रारी आढळून आल्या.
या संदर्भात जिल्ह्याच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी संबंधित लक्षणे दिसणाऱ्या लाभार्थ्यांशी संपर्क साधला. मात्र, त्यांना फार त्रास होत नसल्याचे सांगितले. त्याशिवाय लक्षणे दिसताच काही काळानंतर पुन्हा प्रकृती ठीक झाल्याचे लाभार्थ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
पुणे शहरात एकही तक्रार आढळली नाही. पिंपरी चिंचवडमध्ये आठ तक्रारी दिसून आल्या. तर जिल्ह्यातील माले प्राथमिक आरोग्य केंद्र, वाघोली केंद्र, सांगवी तसेच सिंबायोसिस रुग्णालयातील असे 58 लाभार्थ्यांना किरकोळ स्वरुपातील लक्षणे आढळल्याची अधिकाऱ्यांनी सांगितले.