सातारा (प्रतिनिधी)- जास्तीत जास्त मतदारांनी मतदान प्रक्रियेत भाग घेऊन मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्पीप कक्षाच्या जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून स्वीप कक्षाच्या अभिनव उपक्रमाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. मुनावळे (ता. जावळी) येथील जलाशयात निवडणुकीची तारीख सात मे, सातारा १०० टक्के व मी मतदान करणारच असे संदेश या अभिनव उपक्रमातून देण्यात आले.
स्वीप कार्यक्रमांतर्गत याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून मुनावळे एमटीडीसी पर्यटन केंद्राच्या सहकार्याने बोटीच्या सहाय्याने मतदारांना सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीचा दिनांक ७ मे, सातारा १०० टक्के व मी मतदान करणारच असे संदेश अभिनव उपक्रमांतून देण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, जावळीचे गटविकास अधिकारी मनोज भोसले, सातारा नगरपालिका तसेच गावचे ग्रामसेवक यांनी प्रयत्न केले.
स्वीप कक्षामधील किरण कांबळे व राजेंद्र भोसले यांनी कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करून येणाऱ्या पर्यटकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती केली. या उपक्रमाच्या फोटो व व्हिडिओमार्फत विविध प्रसारमाध्यमांवरती मतदान जनजागृती करण्यात आली. हा जनजागृतीचा नावीन्यपूर्ण उपक्रम ठरला असून याव्दारे मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी निश्चित मदत होणार आहे.
जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप कक्षाद्वारे जनजागृती करण्यात आली आहे. कमी मतदान झालेल्या गावांवर लक्ष केंद्रित करुन त्याठिकाणी मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदान केंद्रांवर मतदारांसाठी जास्तीत जास्त सुविधा पुरवण्याबाबत नियोजन केले आहे. जास्तीत जास्त मतदारांनी दि. ७ मे रोजी मतदान करुन आपले कर्तव्य पार पाडावे.
– याशनी नागराज (मुख्य कार्यकारी अधिकारी)
१) मतदान जनजागृतीबाबत मार्गदर्शन करताना याशनी नागराजन शेजारी अर्चना वाघमळे, शबनम मुजावर, प्रभावती कोळेकर, मनोज भोसले व इतर.
२) मुनावळे जलाशयात अशी साकारलेली मतदानाची तारीख.
३) जलाशयात बोटीद्वारे अक्षररचनेतून पर्यटकांचे लक्ष वेधले.
४) जलाशयात सातारा शंभर टक्के अभिनव जागृती उपक्रम राबविला.