श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील सहा जणांना कोव्हिड- 19 या आजाराचे संशयित म्हणून आज ताब्यात घेतले आहे. यास तहसीलदार महेंद्र माळी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दुजोरा दिला आहे.
हे सहा जण दोन दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यातील एका करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यामुळे या सहा जणांची तपासणी करणे गरजेचे आहे. शनिवारी दुपारी या सहा जणांना नगरला पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. या सहा जणांमुळे श्रीगोंदा तालुक्यातील करोना संशयीतांची यादी संपण्याचे नाव घेऊना. यापूर्वी पाठवलेले चारही रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र पुन्हा सहा जण करोना बाधिताच्या संपर्कात आल्याने चिंता वाढली आहे. यापूर्वी श्रीगोंद्यातील चारही जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असला, तरी तालुक्यातील लोकांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन केले.
तीन दिवस पूर्ण लॉकडाऊन : माळी
दरम्यान, श्रीगोंदा तालुका आता उद्यापासून तीन दिवस पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना आता तालुक्याच्या उंबरठ्यावर असून, या तीन दिवसांत नागरिकांनी सहकार्य करावे, अन्यथा आम्हाला कठोर पावले उचलावी लागतील, असा इशारा तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिला.