राज्यसभा निवडणुकीत कॉंग्रेसने 58 जागा जिंकल्या
नवी दिल्ली, दि. 27 – राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीत कॉंग्रेसने 69 पैकी 58 जागा जिंकून राज्यसभेतील आपले बहुमत वाढविले आहे. एकूण 28 जागांची निवड बिनविरोध झाली, त्यातील 24 जागा कॉंग्रेसने जिंकल्या. 41 जागांसाठी निवडणुका झाल्या. त्यात कॉंग्रेसने 34 जागा जिंकल्या, तर जनसंघाने 2 जागा जिंकल्या आहेत.
महाराष्ट्रात कॉंग्रेसचे सर्व 6 उमेदवार विजयी
मुंबई – महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचे सर्व 6 उमेदवार विजयी झाले. निवडणुकीसाठी एकंदर आठ उमेदवार सहा जागांसाठी उभे होते. सर्वश्री वैशपायन, बॅ. अंतुले, म्हैसकर, गाडगीळ आणि देशमुख हे कॉंग्रेसचे विजयी उमेदवार आहेत.
नवीन शैक्षणिक आकृतिबंध अंमलबजावणीस समिती
मुंबई – शिक्षण क्षेत्रात नवीन शैक्षणिक आकृतीबंध (10+2+3) अंमलात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार एक नवीन समिती नेमणार आहे. या समितीत शिक्षणतज्ज्ञ व अनुभवी लोकांचा समावेश असेल असे विधानसभेत शिक्षणमंत्री प्रभा राव यांनी सांगितले. नवीन आकृतीबंध अंमलात आणण्यामधील त्रुटी व अडचणींवर कशी काय मात करावी, यासंबंधी या समितीने सरकारला सूचना करावयाच्या आहेत.
हा आकृतीबंध अंमलात आणताना जो शिक्षकांचा प्रश्न उपस्थित होणार आहे, त्यासंबंधी या समितीने सूचना करावयाच्या आहेत. दोन महिन्यांच्या आत ही समिती आपला अहवाल सरकारला सादर करील, अशी अपेक्षा आहे.