पिंपरी – गेल्या 24 तासात करोनाने तब्बल 41 रुग्णांचा बळी घेतला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंत करोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा 719 वर जाऊन पोहोचला आहे. तर शहरात उपचार घेत असलेल्या परंतु शहराबाहेरील रहिवासी असलेल्या 141 रुग्णांना करोनामुळे प्राण गमावावे लागले आहेत. आतापर्यंत शहरात करोनामुळे तब्बल 860 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी सायंकाळी महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार गेल्या 24 तासांमध्ये शहरातील 853 आणि शहराबाहेरील 12 रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. यामुळे शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 37716 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी 25399 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये रोज बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या एक हजाराच्या आत आली असली तरी मृत्यूचे प्रमाण मात्र वाढत आहे. तसेच प्रतिक्षेतील अहवालांची संख्याही वाढत आहे. बुधवारी 2863 अहवाल प्रतिक्षेत होते.
जिल्हा रुग्णालयात 30 करोनाबाधितांची भर
सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात 30 करोनाबाधित रुग्णांची पडली. पिंपळे निलख येथील 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तीन रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडले. रुग्णालयामध्ये सध्या 47 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 25 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयात 77 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.