नाट्यमय घडामोडीदरम्यान अध्यक्ष, पंतप्रधानांना बंडखोरांनी घेतले ताब्यात
सरकारी वृत्तवाहिनीवरून अध्यक्षांची राजीनाम्याची घोषणा ; संसदही विसर्जित
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक सुरू ; आंतरराष्ट्रीय समुदायाकडून चिंता व्यक्त
बामको (माली) – सैन्याने केलेल्या सशस्त्र उठावाच्या पार्श्वभूमीवर मालीचे अध्यक्ष इब्राहिम बौबकर कैता यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी रात्री झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर कैता यांनी पायउतार व्हायचा निर्णय घेतला. कैता यांच्या गच्छंतीसाठी गेल्या काही महिन्यांपासून मालीमध्ये असंतोष धुमसत होता. त्या नाट्याची आता अखेर झाली.
कैता यांनी राजीनामा दिल्यामुळे सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्यांनी जल्लोष केला आहे. माली ही पूर्वी फ्रान्सची वसाहत होती. त्यामुळे फ्रान्स आणि अन्य देशांनी या घडामोडींबाबत चिंता व्यक्त केली आहे. मालीमधील सर्व नाट्यमय घडामोडींबाबत चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची आज बैठक होत आहे. मालीमध्ये संयुक्त राष्ट्राचे तब्बल 15,600 शांतिसैनिक तैनात आहेत. याशिवाय फ्रान्स आणि अन्य देशांचे शांतिसैनिक 2013 पासून तेथे तैनात आहेत.
मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास कैता यांनी सरकारी वृत्तवाहिनीवरून देशवासीयांना उद्देशून केलेल्या संबोधनात आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. अध्यक्षपदाच्या अखेरची टर्म संपण्यासाठी तीन वर्षे शिल्लक असतानाच आपल्याला तातडीने राजीनामा द्यावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
“सत्तेत कायम राहण्यासाठी रक्तपात व्हावा, अशी माझी इच्छा नाही. अध्यक्षपदावरून मी पायउतार होत आहे.’ असे कैता म्हणाले. आपले सरकार आणि संसदही विसर्जित केली जाणार आहे. गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेली इस्लामिक बंडखोरी आणि करोनाच्या साथीमुळे देशात गोंधळाची स्थिती असणार आहे, हे निश्चित असल्याचेही त्यांनी सांगितले. कैता हे 2013 साली अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. तर 5 वर्षांनंतर त्यांची अध्यक्षपदी फेरनिवडही झाली होती.
काही महिन्यांपूर्वी मालीत झालेल्या निवडणुका वादग्रस्त ठरल्या होत्या. त्यानंतर इस्लामिक बंडखोरीला हाताळण्यात सरकारला अपयश आल्याबद्दल गेल्या काही महिन्यांपासून सरकारवर टीकाही होत होती. मालीतील सैन्य गेल्या दोन वर्षांपासून इस्लामिक स्टेट आणि अल-कायदाशी संबंधित गटांबरोबर संघर्ष करत आहे. देशाच्या उत्तर भागात 2019 मध्ये झालेल्या अनेक भीषण हल्ल्यांमुळे सरकारने त्या भागातील व्यवहारच बंद केले आहेत.
मंगळवारी झालेल्या घडामोडींवर आफ्रिकन युनियन, अमेरिका आणि “इकोवास’ नावाच्या प्रादेशिक आघाडीने टीका केली आहे. मालीतील राजकीय संकटामध्ये ही आघाडी मध्यस्थी करण्याच्या प्रयत्नात आहे.
आठ वर्षांपूर्वीच्या बंडाची पुनरावृत्ती…
मंगळवारी सैनिकांनी काफी या बंदिस्त शहरातील शस्त्रागारातील शस्त्रे ताब्यात घेतली आणि राजधानी बामकोवर चाल केली. बंडखोर सैनिकांनी अध्यक्ष कैता आणि पंतप्रधान बाऊबौ किसे यांनाही ताब्यात घेतले होते. आठ वर्षांपूर्वी अशाच प्रकारे मालीतील सैनिकांनी उठाव केला होता. त्यामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी इस्लामी बंडखोरांनी भरून काढली होती. तेव्हा सैनिकांच्या ज्या तुकडीने उठाव केला होता. त्याच तुकडीतील सैनिकांनी मंगळवारीही बंड केले आहे. मात्र, बंडखोर सैनिकांच्यावतीने आजपर्यंत कोणतेही निवेदन प्रसिद्धीस देण्यात आलेले नाही.