बंगळुरू -कर्नाटकमध्ये कॉंग्रेसने आयोजित केलेल्या भोजन समारंभाला भाजपचे ३ आमदार उपस्थित राहिले. ती घडामोड भुवया उंचावणारी ठरली आहे. भाजपने संबंधित आमदारांच्या कृतीची गंभीर दखल घेतली असून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्याचे सूतोवाच केले आहे.
कॉंग्रेसने बुधवारी बेळगावमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली होती. त्या बैठकीनंतर भोजन समारंभाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये एस.टी.सोमशेखर, शिवराम हेब्बार आणि एच.विश्वनाथ हे भाजपचे आमदार सहभागी झाले.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांनी त्यांना निमंत्रण दिले होते. त्या निमंत्रणाचा स्वीकार भाजपच्या संबंधित आमदारांनी केल्याने ते पुन्हा पक्ष बदलण्याच्या मूडमध्ये आहेत का याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे.
कर्नाटकमध्ये कॉंग्रेस-जेडीएस आघाडीचे सरकार असताना २०१९ यावर्षी दोन्ही पक्षांच्या १७ आमदारांनी बंड केले. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तो पक्ष सत्तेवर येऊन कॉंग्रेस-जेडीएस आघाडी सरकार कोसळले.
बंड करणाऱ्या आमदारांमध्ये सोमशेखर, हेब्बार आणि विश्वनाथ यांचाही समावेश होता. कर्नाटकात काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करून कॉंग्रेसने सत्ता हस्तगत केली.
तेव्हापासून तिन्ही आमदार जाहीरपणे भाजपच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त करत आहेत. अशात त्यांची कॉंग्रेसच्या मेजवानीला उपस्थिती राजकीय सनसनाटी निर्माण करणारी ठरली आहे.
लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्या निवडणुकीत कर्नाटकमध्ये चांगली कामगिरी करून दाखवण्याचा निर्धार कॉंग्रेसने केला आहे. एवढेच नव्हे तर, इतर पक्षांच्या नेत्यांसाठी दरवाजे खुले ठेवण्याचा इरादाही वारंवार बोलून दाखवला आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या मेजवानीत भाजप आमदारांच्या सहभागाचे राजकीय महत्व वाढले आहे.