सराईतांच्या बंदोबस्तासाठी “ऑपरेशन ऑलआऊट’ : मोठा शस्त्रसाठा जप्त
पुणे – नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहर पोलिसांनी संयुक्त मोहीम हाती घेत संपूर्ण शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराईतांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या “ऑपरेशन ऑल आऊट’ या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी कोम्बिंगमध्ये तब्बल 2 हजार 893 गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. त्यापैकी 756 गुन्हेगार मिळून आले आहेत. तर, 414 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले असून, 443 जणांना अटक केली आहे. यावेळी 16 लाख 62 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बेकायदा अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी आठ जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून 7 पिस्तुले, 1 गावठी कट्टा व 9 जिवंत काडतुसे असा 2 लाख 99 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या परिसरात अमलीपदार्थ (एमडी) बाळगल्याप्रकरणी एकाला अटक केली. त्याच्या ताब्यातून 7 लाख 56 हजार रुपये किमतीचे 63 ग्रॅम एमडी जप्त केले.
बुधवारी रात्री 10 वाजल्यापासून ते गुरुवारी पहाटे 1.30 वाजेपर्यंत परिमंडळ एक ते पाचच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. स्थानिक पोलीस ठाण्यांच्या पथकांबरोबरच सर्व गुन्हे शाखांच्या पथकांनी यामध्ये सहभाग घेतला.
66 जणांना अटक
बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाईदरम्यान शहरात 66 जणांना अटक करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्या ताब्यातून 48 कोयते, 14 तलवारी, 1 कुकरी, 5 पालघन असा 17 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये गुन्हे शाखेने 38 गुन्हे दाखल करून 38 जणांना अटक केली.
16 तडीपार सापडले
तडीपारीच्या कारवाईनंतरदेखील नियमांचे उल्लंघन करत सराईत गुन्हेगार शहरात वास्तव्य करत असल्याचे दिसून येते. कोम्बिंगदरम्यान 16 तडीपार गुन्हेगार शहरात बेकायदा वास्तव्य करत असताना मिळून आले आहे. त्यांच्यावर 142 प्रमाणे कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच 122 प्रमाणे संशयितपणे फिरणाऱ्या 28 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.