पुण्यात करोनाराेधक लसीकरणाचे युद्धपातळीवर नियोजन

18 विभागांचे "टीमवर्क' : "टास्क फोर्स'ने तयार केला आराखडा

पुणे  – शहरात देण्यात येणाऱ्या करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी एकूण अठरा विभागांची मदत घेतली जाणार असून, त्यांच्या “टीमवर्क’ मधून लसीकरणाचा हा “टास्क’ पूर्ण करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी स्थापन केलेल्या “शहर कोविड टास्क फोर्स समिती’ने याबाबतचा आराखडा तयार केला आहे.

 

 

शहरात आरोग्य कर्मचाऱ्यांसह 44 लाख नागरिकांना लस देण्याचे नियोजन असून, त्यासाठी 88 लाख लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी लसीकरण बुथची जागा शोधण्याची जबाबदारी भूमीजिंदगी विभागाकडे देण्यात आली आहे. भवन रचना विभागाकडे बुथ उभारण्याचे नियोजन, आस्थापना विभागाकडे प्रामुख्याने तृतीयश्रेणी मनुष्यबळ पुरवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाकडे कॉम्प्युटर ऑपरेटर, पाणीपुरवठा विभागाकडे पाणी पुरवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. घनकचरा विभागाला बुथवर स्वच्छता करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

 

तसेच सॅनिटायझेशन चे काम आरोग्य विभागाकडेच असणार आहे. याशिवाय विद्युत विभाग, ऍम्ब्युलन्स साठी व्हेईकल डेपो आणि अन्य विभागांचाही समावेश यामध्ये करण्यात आला आहे. तसेच माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडे कॉम्प्युटरला इंटरनेट सुविधा जोडणी करणे, जनसंपर्क अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी आणि आकाशचिन्ह विभागाकडे लसीकरणाविषयी जनजागृती करण्याची जबादारी आहे. “व्हेईकल डेपो’ कडे रुग्णवाहिका आणि वाहतूक नियोजन, 108 ऍम्ब्युलन्स सेवेचे समन्वय, याशिवाय खासगी रुग्णालये आणि डॉक्टरांचीही मदत घेतली जाणार.

 

 

बुथवर जनजागृती करण्यासाठी रोटरी अणि लायन्स क्लब सारख्या संस्थांची मदत घेतली जाणार आहे. तर लसटोचकांचे प्रशिक्षण आणि रिऍक्शन आल्यास त्यांचे व्यवस्थान कसे करायचे याचे प्रशिक्षण या आयएमए, जीपीए, फॉग्सी या डॉक्टरांच्या संघटना देणार आहेत. तर जागतिक आरोग्य संघटना हे लसीकरणाबाबत मार्गदर्शक तत्त्वांच्या आखणीसाठी सहकार्य करणार आहेत.

 

शहरात आठ लाख डोसची शीतसाखळी क्षमता

शहरात आठ लाख करोना प्रतिबंधक लसीचे डोस मावतील इतकी शीतकरण साखळीची क्षमता उपलब्ध आहे. यामध्ये लस 2 ते 8 सेल्सिअस तापमानात ठेवण्यासाठी 70 “आयएलआर’ (आईस लाइन्ड रेफ्रिजरेटर), लस मायनस 18 सेल्सिअस तापमानात ठेवण्यासाठी 40 डीप फ्रीजर, लसीकरण केंद्रापर्यंत ती घेऊन जाण्यासाठी 20 कोल्ड बॉक्स आणि 700 वॅक्सिन कॅरिअर असे साहित्य उपलब्ध आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.