नगर -पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडून 4 जणांचे 14 दिवसांनंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने ते आता करोनामुक्त झाले आहेत. आलमगीर येथील दोघे रुग्ण तर सर्जेपुरा आणि आष्टी (जि. बीड) येथील प्रत्येकी एक रुग्णाला बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. या रुग्णांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
त्यामुळे जिल्ह्यात करोनामुक्तची संख्या 24 झाली असून नगरकरांसाठी आनंदाची बातमी आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी येथील एक रुग्ण बाधित आढळून आल्याने त्याच्या संपर्कातील इतर दोघांना करोनाची लागण झाली होती.याशिवाय, नगर शहरातील सर्जेपुरा येथील एकालाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. या रुग्णांच्या 14 दिवसांनंतरच्या दोन्ही चाचण्या गुरुवारी निगेटिव्ह आल्या. शुक्रवारी त्यांना बूथ हॉस्पिटलमधून निरोप देण्यात आला.
सध्या बूथ हॉस्पिटलमध्ये जामखेड येथील 5, नेपाळहून संगमनेर येथे आलेले 4, नेवासा येथील 2 आणि एक परदेशी असे 12 रुग्णावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, काल एकाच दिवशी करोना बाधितांची संख्या 5 ने वाढली. नेपाळ येथून संगमनेर येथे आलेल्या 14 व्यक्ती पैकी 4 व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
4 एप्रिल रोजी या व्यक्तींना एका इमारतीतून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांची तपासणी
केली असता अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र, 14 दिवसानंतर 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. याशिवाय, जामखेड येथे बुधवारी करोना बाधीत आढळलेल्या 2 व्यक्तींपैकी एकाच्या वडिलांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. काही दिवसापूर्वी मृत्यु पावलेल्या जामखेड येथील रुग्णाची दोन्ही मुले करोना बाधीत झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या दोन युवकांना बुधवारी लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.