नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने गुरुवारी पश्चिम बंगालमधील भाजपच्या आणखी एका नेत्यावर आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल कारवाई केली. त्यानुसार, थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर 24 तासांची प्रचारबंदी घालण्यात आली.
बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यासाठीच्या मतदानावेळी मोठा हिंसाचार झाला. एका ठिकाणी केंद्रीय सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात चौघे मृत्युमुखी पडले. त्याचा संदर्भ घेऊन घोष यांनी एका प्रचारसभेत केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले. कुणी मर्यादा ओलांडल्यास तशाप्रकारच्या घटना अनेक ठिकाणी घडतील, असे घोष यांनी म्हटले. त्या वक्तव्यावर आक्षेप घेत बंगालमधील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. त्यावरून आयोगाने कारवाईचे पाऊल उचलले. तसेच, घोष यांना आचारसंहितेचा भंग करणारी वक्तव्ये न करण्याचा इशारा दिला.