पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात मराठा समाजाचे सर्वेक्षण २३ जानेवारीपासून हाती घेण्यात आले आहे. मराठा समाजाचे शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक मागासलेपण तपासण्यात येत आहे. घरोघरी जाऊन प्रगणक व पर्यवेक्षक सर्वेक्षण करीत आहे. काही भागांत प्रगणकांना जात विचारताना विरोध होत असल्याचे समोर आले आहे. ३१ जानेवारीपर्यंत शहरात ४ लाख ५० हजार कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. महापालिकेकडे सर्वेक्षण करण्यासाठी आता एकच दिवस शिल्लक राहिला आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात २३ जानेवारीपासून शहरात मराठा सर्वेक्षण सुरू आहे. दोन हजार प्रगणकांद्वारे आतापर्यंत ४ लाख ५० हजार कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यात अनेक अडथळे येत असले तरी प्रगणक व पर्यवेक्षक ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ॲपवर गोळा झालेल्या नोंदींचा डाटा मागासवर्गीय आयोगाच्या सर्व्हरवर जमा करण्यात येत आहे. तरी, शहरात किती मराठा कुणबी नोंदी आढळल्याची माहिती समोर येऊ शकलेली नाही.
सर्वेक्षण फॉर्म भरुन घेताना ॲपमध्ये सातत्याने अडचणी येत आहेत. ॲप हँग होत आहे. काही भागांमध्ये जात विचारल्यामुळे सर्वेक्षणास विरोध केल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. सद्यस्थितीत शहरात साडेचार लाख कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. राज्य शासनाने २ फेब्रुवारीपर्यंत सर्वेक्षणास मुदतवाढ दिली आहे. आता एका दिवसांत २० टक्के सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आव्हान प्रगणकांसमोर आहे.
नागरिकांनी सहकार्य करावे
सर्वेक्षण करण्यासाठी प्रगणक अथवा पर्यवेक्षक आल्यास त्याला नागरिकांनी सहकार्य करावे. त्यांना संपूर्ण माहिती द्यावी. समजा, एकजण शहरात राहत असेल आणि त्यांचे आई- वडील गावाकडे असतील आणि त्यांनी गावाकडे सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली असेल, तर येथे माहिती देण्याची आवश्यकता नाही. त्याचा सर्वेक्षणामध्ये समावेश झालेला असतो, अशी माहिती सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितली.