हेमंत शेडगे यांची आर्थिक गुन्हे शाखा येथे बदली
यवत – राज्यातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले असून, अंमलदार, पोलीस निरीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षकांदेखील बदल्या गृह विभागाकडून करण्यात आल्या आहेत.
दौंड आणि यवत येथील पोलीस ठाण्यातही मोठे बदल करण्यात आले आहेत. दौंड शहर पोलीस ठाण्यातील भाऊसाहेब पाटील यांच्या जागी अहमदनगर येथील कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची नियुक्ती, तर भाऊसाहेब पाटील यांची जिल्हा वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.
चंद्रशेखर यादव यांनी आज (गुरुवार, दि. १) दौंड पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला आहे. तसेच, यवत पोलीस ठाण्याचे हेमंत शेडगे यांची आर्थिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण याठिकाणी बदली झाली असून, त्यानी आज (दि.०१) रोजी सांगली शहर येथून बदलून आलेले नारायण देशमुख यांची याठिकाणी वर्णी लागली आहे.
हेमंत शेडगे यांना पोलीस कर्मचारी आणि ग्रामस्थांनी निरोप देत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नवनियुक्त नारायण देशमुख यांनी यवत पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला. याप्रसंगी यवत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.