पिंपरी – अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. या आदेशाबाबत जनजागृती नंतरही दुकाने सुरू ठेवणाऱ्या 16 जणांवर चिखली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरासह जगभरात करोना या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत शहरातील पोलिसांनी ध्वनीक्षेपकावरून चिखली परिसरातील सर्व नागरिकांना बुधवारी (दि.18) आवाहन केले होते.
मात्र त्यानंतरही गुरुवारी अनेक दुकानदारांनी पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत दुकाने सुरूच ठेवली. यामुळे चिखली पोलिसांनी 16 दुकानदारांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार गुन्हे दाखल केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.