पुणे – करोनाचा प्रसार होऊ नये तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रेशन दुकानातून शिधावस्तूंचे वितरण करताना लाभार्थ्यांची बायोमेट्रीक पडताळणी न करता रास्तभाव दुकानदारांनी स्वत:चे आधार अधिप्रमाणीत करून धान्य वाटपाची सुविधा ई-पॉस उपकरणावर उपलब्ध करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थ्यांना ई-पॉस उपकरणावर बोट, अंगठा लावण्याची आवश्यकता राहणार नाही. ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स फेडरेशनच्या मागणीला यश आले आहे.
रास्तभाव दुकानात लाभार्थ्यांना ई-पॉस उपकरणावर बोट, अंगठा लावण्याची आवश्यकता नाही. यामुळे विषाणूचा संसर्ग टाळता येईल. तसेच, रास्तभाव दुकानांवर गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याकरिता टोकन देऊन लाभार्थ्यांना नियोजित वेळी दुकानावर येण्याची खबरदारी घ्यावी. तसेच, धान्य घेण्यास आलेले लाभार्थी योग्य अंतर ठेऊन रांगेत उभे राहतील, याचीही दक्षता रास्तभाव दुकानदारांनी घ्यावी.
कल्याणकारी संस्थांची संख्या मर्यादित असल्याने या संस्थांना गोदामातून देण्यात येणारे धान्य वितरीत करताना संबंधितांनी साबणाने, सॅनिटायझरने हात स्वच्छ करून ई-पॉस उपकरणे हाताळण्याची काळजी घ्यावी. तसेच, लाभार्थ्यांना धान्य वाटप करताना धान्याचा अपहार, अनियमितता होणार नाही याची दक्षता रास्तभाव दुकानदारांनी घ्यावी. मात्र, वाटप केलेल्या धान्याची जबाबदारी रास्तभाव दुकानदार यांची राहील. ही सुविधा 31 मार्चपर्यंतच लागू राहील, असे विभागाच्या वतीने स्पष्ट केले.
याबाबत संघटनेच्या वतीने अन्न व नागरी पुरवठा विभागाशी पत्रव्यवहार केला होता. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी ई-पॉस मशीनचा वापर काही दिवसांकरिता स्थगित करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत, या विभागाने त्याच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.
– विजय गुप्ता, खजिनदार, ऑल महाराष्ट्र फेअरप्राईज शॉपकिपर्स फेडरेशन