पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेला मंगळवार (दि.21) पासून सुरुवात होणार आहे. यंदा या परीक्षेसाठी राज्यातील 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून 3 हजार 195 केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. कॉपीमुक्त अभियान राबविण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.
राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन परीक्षेच्या तयारीबाबतची सवीस्तर माहिती दिली. यावेळी राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर आदी उपस्थित होते. बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत होणार आहेत. या परीक्षेसाठी 7 लाख 92 हजार 780 विद्यार्थी तर 6 लाख 64 हजार 441 विद्यार्थीनींनी नोंदणी केलेली आहे. परीक्षेसाठी 6 हजार 516 दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे.
72 ट्रान्सजेंडर विद्यार्थीही परीक्षेला बसणार आहेत. एकूण 10 हजार 388 कनिष्ठ महाविद्यालयातून ही नोंदणी झालेली आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सर्वाधिक वाढ झालेली आहे. करोना कालावधीत झालेल्या परीक्षेसाठी देण्यात आलेल्या सर्व सवलती यंदा रद्द करण्यात आलेल्या आहेत.
दोन विषयांची परीक्षा ऑनलाइन
माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या विषयासाठी एकूण 1 लाख 62 हजार 263 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून 1 हजार 923 केंद्रावरुन परीक्षा होणार आहे. सामान्यज्ञान या विषयाची परीक्षाही ऑनलाइन होणार असून या विषयासाठी 2 हजार 68 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली असून 42 केंद्रावरुन ही परीक्षा होणार आहे.