रस्ते दुरुस्ती, नालेसफाईबाबत आयुक्तांकडे आज बैठक
यंदा चार महिने आधीच तयारी
पुणे – शहरात गेल्या दोन वर्षांत पावसाळ्यात नालेसफाई तसेच पावसाळी वाहिन्यांच्या सफाईसह, खोदाईनंतर रस्त्यांची योग्य दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे पालिकेच्या कारभारावर टीकेची झोड उठली. अखेर महापालिकेने यंदा चार महिने आधीच शहरात पावसाळापूर्व कामे करण्याचे नियोजन केले आहे.
शहरात दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती तसेच खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मंगळवारी प्रशासनाची बैठक बोलाविली आहे. बैठकीत रस्ते दुरूस्ती, नालेसफाई, ड्रेनेज स्वच्छता, पाणी साचणाऱ्या ठिकाणी उपाययोजना, खोदाईनंतर रस्ते दुरुस्तीबाबत चर्चा केली जाणार आहे.
गेल्या दोन वर्षांत शहरात पाणी तुंबण्याच्या घटना वाढल्या आहेत. नाल्यांवरील अतिक्रमणे, रस्त्यांची अर्धवट कामे, अपुरी नालेसफाईमुळे मोठे नुकसान झाले आहे. मागील वर्षी समान पाणीपुरवठा योजना आणि खासगी केबल वाहिन्यांच्या कामांसाठी पालिकेने पावसाळ्यातही खोदाईस मान्यता दिली होती.
त्यामुळे रस्त्यांची दुरुस्तीच झाली नाही. परिणामी, रस्त्यांची चाळण झाली होती. त्यामुळे महापालिके यंदा चार महिने आधीच पावसाळापूर्व कामे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणेकरांना यंदातरी दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.