पुणे – शहरात एका पोलीस ठाण्यातील 8 पोलीस कर्मचाऱ्यांना करोना संसर्ग झाल्याचे यापूर्वी समोर आले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित पोलीस ठाण्यातील सुमारे 127 कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, यामुळे अन्य कर्मचाऱ्यांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही. त्यांच्या सुरक्षेबद्दल योग्य ती काळजी घेली जात आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या विषाणूविरोधात लढा देण्यासाठी पुणे शहरातील पोलीस दल दिवसरात्र रस्त्यांवर पहारा देत आहेत. या कर्मचाऱ्यांना करोना संसर्ग होऊ नये, त्यांना यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहेत. असे असतांनाही एका पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी काही दिवसांपूर्वी करोनाबाधित सापडला होता. त्यानंतर हळूहळू ही संख्या वाढून आता आठ झाली आहे. त्यामुळे आता एक संपूर्ण पोलीस ठाणेच क्वारंटाइन करण्यात आले आहे. यामध्ये 117 कर्मचारी आणि 10 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. खबरदारीचा उपाय म्हणून येथील संपूर्ण स्टाफ क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
करोनाच्या लढतीत वैद्यकीय क्षेत्रांएवढेच पोलिसांनाही सामोरे जावे लागते. चीन आणि अमेरिकेत पोलीस बाधित होण्याचे प्रमाण मोठे असल्याचे भीषण वास्तव स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यात पोलिसांच्या आरोग्याबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे. मात्र करोना रोखण्याच्या लढ्यात त्यांची कामगिरी महत्त्वाची असल्याने त्यांना सेवा बजवावी लागते.
मुंबईत दोन पोलिसांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात पोलिसांना बाधा झाल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शहराच्या मध्यभागातील एका पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन केले आहे.