करोनाचा विळखा आणखी वाढण्याची भीती
पुणे – शहरात लॉकडाऊन शिथिल होतानाच; दुसऱ्या बाजूला करोना बाधितांचा दरदिवशीचा सरासरी वेगही कमालीचा वाढला आहे. मागील सात दिवसात शहरात तब्बल 1250 नवीन रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे हा दर प्रतिदिन सरासरी 178 रुग्ण आहे. आता लॉकडाऊन शिथील होतानाच हा दर आणखी वाढण्याची भीती आहे.
शहरात 9 मार्च रोजी करोनाचा पहिला बाधित आढळला. त्यानंतर 31 मार्चपर्यंत शहरातील एकूण बाधितांची संख्या 38 होती. तर हा आकडा 30 एप्रिपर्यंत सुमारे 1,518 पर्यंत गेला. ही आकडेवारी पाहता, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 49 नवीन बाधितांची भर पडली.
मात्र, मेच्या सुरूवातीपासूनच लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल होतानाच दररोज सापडणाऱ्या रुग्णांचा सरासरी आकडा तब्बल तिपटीने वाढून तो 159 झाला. दि. 1 ते 31 मे या कालावधीत 4,934 नवीन करोनाबाधित आढळून आले. तर 31 मेअखेर शहरातील रुग्णसंख्या 6,472 वर गेली. दि.3 मे आणि दि.17 मेनंतर बहुतांश लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णसंख्याही काही प्रमाणात वाढल्याची कबुली प्रशासनाने दिली आहे.
6 दिवसांतच हजाराचा आकडा ओलांडला
जूनच्या पहिल्या सात दिवसांत शहरात सुमारे 1,250 नवीन बाधितांची भर पडली आहे. हा वेग कायम राहिल्यास जूनमध्ये दिवसाला नव्याने वाढणाऱ्या बाधितांचा आकडा सर्वाधिक असण्याची भीती आहे. करोना संगर्स कमी करण्याचा प्रशासन प्रयत्न करत असले, तरी हा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.