सातारा (प्रतिनिधी) – शाळा सुरु करण्याबाबत शासनाने पूर्व तयारी सुरु केली असून सर्व शिक्षकांना मुख्यालयाच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर आणि प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी काढले आहेत. कंटेनमेंट झोन आणि करोना ड्युटीवरील शिक्षकांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
करोनाचा वाढत असलेल्या प्रादुर्भावामुळे प्राथमिक आणि माध्यमिक शाळा कधी सुरु होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार शाळा सुरु करण्याबाबत जुलै महिन्यात विचार करण्यात येईल असे सांगण्यात आले. राज्य सरकारने मात्र जून महिन्यातच शाळा सुरु करण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. त्यानुसार सर्व मुख्याध्यापकांना शिक्षण विभागाने प्रश्नावली पाठवली होती. या माध्यमातून पालक, शाळा समिती, सरपंच, विविध क्षेत्रातील मान्यवरांची मते घेण्यात आली. त्यानुसार सुमारे 60 टक्के शाळा सुरु होतील अशी अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली होती. कंटेनमेंट झोन आणि विलगीकरण कक्ष केलेल्या शाळा सोडून ग्रामीण भागातील कमी पटाच्या शाळा सुरु करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. शहरी भागात मात्र बहुतांश शाळा बंद राहतील असे सध्याचे परिस्थितीवरुन दिसत आहे.
शिक्षण विभागाकडून सातारा जिल्ह्यात पाठ्यपुस्तके पोहोच करण्याचे काम अंतिम टप्यात आहे. शाळा दि. 15 जूनपासून काही प्रमाणात सुरु करण्याचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर आणि प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी एक संयुक्त आदेश काढून शिक्षकांना मुख्यालयाच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश काढले आहेत. या शिक्षकांनी शासनाच्या येणाऱ्या सुचनांची अंमलबजावणी करायची आहे. शाळा, इमारती, परिसर स्वच्छ करणे, शैक्षणिक पटनोंदणी सप्ताह साजरा करणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या मिटींग घेणे ही कामे शिक्षकांनी करावयाची आहेत. ज्या शिक्षकांना या कालावधीत कोविड – 19 बाबत कामकाज देण्यात आले आहे, त्यांनी त्यांच्या नियुक्तीप्रमाणे काम करायचे आहे. त्या शाळेतील इतर शिक्षकांनी वरील कामे करायची आहेत. शाळा सुरु करण्यासंदर्भातील आवश्यक माहिती गुगल लिंकवर दोन दिवसात भरावी. यापूर्वी अशी माहिती दिली असेल तरीही नव्याने ही माहिती अद्यायावत स्थिती लक्षात घेवून भरायची आहे, असेही आदेशात म्हटले आहे.