कोरेगाव -तालुक्यातील भाडळे- किन्हई परिसरासह दुष्काळी भागातील 17 गावांसाठी वरदान ठरलेल्या वांगना उपसा जलसिंचन योजनेस 125 कोटी 6 लाखांची द्वितीय प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाचे सहसचिव अतुल कपोले यांनी यासंदर्भातील अध्यादेश काढला आहे. माजी मंत्री, आमदार शशिकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नामुळे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी योजनेला निधीची उपलब्धता करुन दिली असून सरकारच्या या निर्णयामुळे 17 गावातील 4200 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
जलसंपदा विभागामार्फत वांगना उपसा जलसिंचन योजना हाती घेण्यात आली असून या योजनेसाठी 1.34 अब्ज घनफूट पाणी वापर प्रस्तावित करण्यात आलेला आहे. या योजनेसाठी 48 कोटी 5 लाखांच्या खर्चास मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली होती. त्यानंतर 79 कोटी 18 लाखांच्या प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली होती.
या योजनेचे काम पूर्णत्वाकडे न गेल्याने आणि दरसूचीतील बदलामुळे झालेली वाढ आदी महत्वांच्या मुद्यामुळे योजनेस द्वितीय प्रशासकीय मान्यता मिळावी, यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याबरोबर त्यांनी बैठक घेऊन योजनेचा आढावा घेतला होता. स्वत: जलसंपदा मंत्री असताना आपण या योजनेला निधी मिळवून दिल्याचेही आमदार शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले होते.
यासंदर्भात मंत्री पाटील यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार त्यांनी 125 कोटी 6 लाखांची द्वितीय प्रशासकीय मान्यता देण्याविषयीचा प्रस्ताव सादर केला होता. जलसंपदा विभागाच्या दि. 24 फेब्रुवारीच्या व्यय अग्रक्रम समितीच्या बेठकीत हा प्रस्ताव विचारार्थ सादर करण्यात आला होता. आमदार शशिकांत शिंदे यांनी यासंदर्भात पुन्हा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन योजनेविषयी चर्चा केली होती. त्यानंतर तातडीने वांगना उपसा जलसिंचन योजनेस द्वितीय प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.