पुणे -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी 7 ते 16 जून अशी मुदत देण्यात आली आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी व श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यात येणार आहेत. माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांना अर्ज करावे लागणार आहेत. विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी 17 ते 21 जून या कालावधीची मुदत देण्यात आली आहे. माध्यमिक शाळांनी बॅंकेत चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी 8 ते 22 जून अशी मुदत देण्यात आली आहे.
माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करण्यासाठी 23 जूनची मुदत दिली आहे. सर्व माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सूचना विचारात घेणे गरजेचे आहे.