कसब्यातून शिवसेना नगरसेवकाची बंडखोरी कायम
पुणे – शहरातील आठ मतदार संघातून तब्बल 59 जणांनी माघार घेतली असून, 106 जण निवडणूक रिंगणात आहेत. माघार घेतलेल्यांमध्ये बंडखोरांचाही समावेश असून, कसब्यातून मात्र शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विशाल धनवडे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत अर्ज मागे घेतला नाही. कॅंटोन्मेंट या एकाच मतदार संघातून सुमारे 30 जणांनी माघार घेतली आहे.
कसबा विधानसभा मतदार संघात 13 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यातील तीन जणांनी माघार घेतली असून, 10 जण निवडणूक रिंगणात आहेत. त्यामध्ये भाजपकडून मुक्ता टिळक तर आघाडीकडून अरविंद शिंदे निवडणूक रिंगणात आहेत. येथे शिवसेनेचे नगरसेवक धनवडे यांनी बंडखोरी केली आहे.
वडगाव शेरी मतदार संघात 17 पैकी पाच जणांनी माघार घेतली असून, 12 जण निवडणूक रिंगणात आहेत. आघाडीचे सुनील टिंगरे आणि भाजपकडून जगदीश मुळीक हे निवडणूक रिंगणात आहेत. शिवाजीनगर मतदार संघातून 13 जणांचे अर्ज वैध ठरले होते. त्यामध्ये एकानेही माघार घेतली नसून, आघाडीतर्फे दत्तात्रय बहिरट तर युतीकडून सिद्धार्थ शिरोळे रिंगणात आहेत.
कोथरूड विधानसभा मतदात तब्बल 10 जणांनी माघार घेतली आहे. या मतदार संघात 21 अर्ज वैध ठरले होते. मात्र आता 11 जण निवडणूक रिंगणात आहेत. युतीकडून थेट भाजप प्रदेशाध्यक्षच निवडणूक लढवत असून, त्यांच्या विरोधात मनसेचे उमेदवार किशोर शिंदे आहेत. शिंदे यांना कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे प्रमुख लढत या दोघांमध्ये होणार आहे.
खडकवासला मतदार संघातून शिवसेनेचे बंडखोर उमेदवार रमेश कोंडे यांनी माघार घेतली असून, आता सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या मतदार संघात नऊ अर्ज वैध ठरले होते. त्यातील दोघांनी माघार घेतली आहे. येथे युतीचे उमेदवार भीमराव तापकीर आणि आघाडीचे उमेदवार सचिन दोडके यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.
पर्वती मतदार संघात 11 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. या मतदार संघात 15 जणांचे अर्ज वैध ठरले होते. त्यातील चार जणांनी माघार घेतली आहे. यामध्ये कॉंग्रेस बंडखोरानेही माघार घेतली असून, आता युतीच्या उमेदवार आणि भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ आणि आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांच्यात लढत होईल.
हडपसर विधानसभा मतदार संघात 19 इच्छुकांमधून पाच जणांनी माघार घेतली असून 14 जण निवडणूक रिंगणात आहेत. युतीचे उमेदवार योगेश टिळेकर, आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे आणि मनसेचे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे यांच्यामध्ये लढत होणार आहे.
पुणे कॅंटोन्मेंट मतदार संघात सर्वात जास्त इच्छुकांची संख्या होती. या मतदार संघात तब्बल 58 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यातील 30 जणांनी माघार घेतली आहे. तरीही 28 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये युतीचे उमेदवार सुनील कांबळे, आघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.