तेरा उमेदवारांची माघार; आजी-माजी आमदारांमध्ये थेट लढत
पिंपरी – पिंपरी विधानसभा निवडणूक रिंगणातून सोमवारी (दि. 7) 13 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात 18 उमेदवार राहिले आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख बंडखोर उमेदवारांनी माघार घेतल्याने आता भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार ऍड. गौतम चाबुकस्वार आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. याशिवाय भाजपाचे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने निवडणुकीतील रंगत वाढण्याची शक्यता आहे.
पिंपरी विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 35 उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यातील 4 उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद ठरले. आज अर्ज माघारीच्या दिवशी 13 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामध्ये प्रामुख्याने भाजपचे बंडखोर उमेदवार अमित गोरखे, माजी नगरसेवक भीमा बोबडे, युतीत मित्र पक्ष असलेल्या रिपाईंच्या चंद्रकांता सोनकांबळे, राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, नगरसेवक राजू बनसोडे, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ, उत्तम हिरवे, कॉंग्रेसचे मनोज कांबळे, सुंदर कांबळे, अपक्ष उमेदवार गौरीशंकर झोंबाडे, विजय रंदिल, सतीश भवाळ, संदीपान झोंबाडे यांनी माघार घेतली.
भाजपचे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी मात्र अपक्ष म्हणून आपला अर्ज कायम ठेवला आहे.
निवडणूक रिंगणातील उमेदवार : ऍड. गौतम चाबुकस्वार (शिवसेना), अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), धनराज गायकवाड (बहुजन समाज पार्टी), गोविंद हेरोडे (बहुजन मुक्ती पार्टी), प्रवीण गायकवाड (वंचित बहुजन आघाडी), संदीप कांबळे (भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी), अपक्ष उमेदवार- नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, चंद्रकांत माने, अजय गायकवाड, अजय लोंढे, मुकुंदा ओव्हाळ, दीपक जगताप, दीपक ताटे, नरेश लोट, मीनाताई खिलारे, युवराज दाखले, राजेश नागोसे, हेमंत मोरे.
पाळला महायुतीचा धर्म –
महायुतीचा धर्म पाळण्यासाठी अमित गोरखे, भीमा बोबडे, चंद्रकांता सोनकांबळे यांनी अर्ज मागे घेतला. राज्यामध्ये महायुतीची सत्ता आणण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा झाल्यानंतर अर्ज मागे घेतल्याचे गोरखे, बोबडे यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून महामंडळ किंवा समितीवर अध्यक्षपद देण्याचे आश्वासन मिळाले. तसेच अर्ज माघारीसाठी शिवसेनेकडून विनंती करण्यात आल्याने अर्ज मागे घेतल्याचे सोनकांबळे यांनी सांगितले.