मुंबई : राज्यात मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. आजपासून मनसे कार्यकर्त्यांनी मशिदींवरील भोंग्यांसमोर हनुमान चालीसा वाजवायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस सतर्क असताना शिवसेना खासदार संजय राऊतांनी मात्र कुठ आहे आंदोलन? असा प्रश्न उपस्थित करत मनसेवर आणि राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
संजय राऊतांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरेंची भूमिका आणि मनसेचे आंदोलन यावरून टीका केली आहे. “आंदोलन आहे कुठे? मुंबईचे पोलीस आयुक्त राज्याचे पोलीस महासंचालक, राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांचे निवेदन पाहिले तर स्पष्ट दिसेल की महाराष्ट्रात भोंग्याच्या बाबतीत कुठेही कायद्याचे उल्लंघन झालेले नाही. हे आंदोलन कोण करतंय मला माहिती नाही. सर्वोच्च न्यायालयाने भोंग्यांच्या बाबतीत जे नियम घालून दिले आहेत त्यावर राज्य सरकार काम करतंय. त्यापलीकडे कुणी बेकायदा काम करत असेल, तर सरकार सक्षम आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
“मला कुठेही आंदोलन दिसत नाही. मुंबईसह महाराष्ट्रात बेकायदेशीर भोंगेच नसतील आणि उलट तुम्ही बेकायदेशीर भोंगे लावत असाल, तर तुम्ही आंदोलन करताय की दुसरं काही कृत्य करताय हे ठरवा. आंदोलनाचा सर्वात जास्त अनुभव या देशात फक्त शिवसेनेला आहे. आंदोलनं कशा प्रकारे करावीत हे शिवसेनेकडून शिकलं पाहिजे. आंदोलनं फक्त प्रसिद्धीसाठी आणि चिथावणीसाठी नसतात. गेली ५०-५५ वर्ष शिवसेना फक्त आंदोलनंच करते आहे. सत्तेत जरी आम्ही असलो, तरी आंदोलनाशी आमचा संबंध कायम आहे. पण जिथे आंदोलनच होऊ शकत नाही, तिथे आंदोलन केलं म्हणायचं”, असे राऊत म्हणाले.
“ठीक आहे, काही लोकांचे छंद असतात. काही लोक राजकारणात हौशे, नवशे, गवशे असतात. त्यांना कुठूनतरी राजकीय प्रेरणा, बळ मिळत असतं. त्यातून असे प्रसंग निर्माण होतात. पण महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार आहे. जरी आघाडीचं सरकार असलं, तरी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना रस्त्यावरील नमाजाच्या संदर्भात काय करायचं आणि मशिदीवरील बेकायदा भोंग्यांबाबत कोणता निर्णय घ्यायचा याचे सल्ले दुसऱ्यांनी द्यायची गरज नाही”, अशा शब्दांत संजय राऊतांनी मनसेवर आणि राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.