पिंपरी (प्रतिनिधी) – गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तारखांचा ‘खेळ’ अखेर आज थांबला असून आठवडाभराच्या आतमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करा असे थेट आदेशच सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात महाालिकांच्या निवडणुका होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
राज्यातील तब्बल 20 महापालिका निवडणुकांची मुदत संपुष्टात आलेली असतानाही करोनामुळे या निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. करोनाची साथ कमी झाल्यानंतर महापालिका निवडणुकांची तयारी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने चालविली होती. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील वातावरण तापल्यानंतर राज्य शासनाने प्रभागरचनेचे अधिकार स्वत:कडे घेतल्यामुळे निवडणुका कधी होणार याबाबत साशंकता निर्माण झाली होती. त्यातच राज्य शासनाने नव्याने प्रभागरचनेसंदर्भात केलेल्या कायद्याच्या विरोधात तब्बल 12 जणांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर पहिली सुनावणी 4 व 7 एप्रिल रोजी झाली होती. त्यानंतर 22 एप्रिल रोजी तारीख देण्यात आली होती. मात्र या दिवशी सुनावणी न होता 4 मे ही तारीख देण्यात आली होती. आज सकाळी सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी झाली. मात्र राज्य शासनाने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयात न टिकल्याने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती खानविलकर, अभय ओक यांनी आठवडाभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याचे आदेशच निवडणूक आयोगाला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच निवडणूका होण्याची शक्यता बळावली आहे.