मुंबईत सर्वाधिक 34 पोलीस करोना पॉझिटिव्ह
मुंबई : राज्यात करोनाबाधित रुग्णांचा दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊनदरम्यान पोलिसांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. मात्र राज्यात जवळपास 64 पोलिसांना करोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने चिंता वाढवली आहे. करोनाबाधित रुग्णांमध्ये 12 अधिकारी आणि 52 कॉन्टेबल यांचा समावेश आहे. करोनाची लागण झालेल्या 64 पोलिसांमध्ये 34 पोलीस मुंबईतील आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय वर्षा बंगल्यावर तैनात असलेल्या एका महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला करोनाची बाधा झाली आहे. या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक महिलेला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना क्वॉरन्टाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या ताफयातील पोलिसालाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, हिंगोलीतील सीआरपीएफच्या सहा जवानांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआरपीएफच्या दोन तुकड्या मुंबईहून परत आल्या होत्या. हे सर्व मुंबईत 45 दिवस तैनात होते. त्यामुळे त्यांना खबरदारी म्हणून क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतून परतल्यानंतर त्यांची टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे.