महाबळेश्वर – करोनाच्या आक्रमणामुळे लागु झालेल्या लॉकडाऊनच्या काळात रोजगाराअभावी सभासदांची चुल बंद होऊ नये, म्हणून अर्बन बॅंकेने सुरू केलेल्या खास कर्ज योजनेसाठी दोन कोटी तर उद्योगधंदा सुरू करण्यासाठी ऑक्टोंबरमध्ये कर्ज वितरणासाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती अर्बन बॅंकेचे अध्यक्ष राजेश कुुंभारदरे यांनी दिली.
या योजनेसाठी अर्ज दाखल केला नसेल त्यांनी त्वरीत कर्ज मागणीचा अर्ज दाखल करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुंभारदरे यांनी केले. मार्चपासून येथील सर्वांचे उद्योगधंदे बंद आहेत. आवक बंद झाल्यामुळे अनेकांसमोर चरितार्थाचा प्रश्न उभा राहिला आहे. रोजगार नसल्याने अनेकांची उपासमार सुरू झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन अर्बन बॅकेने खास घरखर्चासाठी सभासदांना कर्ज देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेतून चार महिने दरमहा साडेबारा हजार रूपये सभासदांना मिळणार आहेत.
तसेच ऑक्टोंबरमध्ये व्यवसायासाठी 50 हजार ते एक लाख रूपयांचे कर्ज देण्यात येणार आहे. पहिल्या योजनेसाठी अनेक सभासदांनी अर्ज दाखल केले. त्यानुसार त्यांना यापूर्वीच पहिला हप्ता त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला. आता याच आठवडयात दुसार हप्ता खात्यावर जमा केला जाणार आहे. या कर्जामुळे सभासदांची चुल बंद होणार नाही, भविष्यात त्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक अडचण येणार नाही, याची काळजी बॅकेने घेतली आहे, असे कुंभारदरे यांनी सांगितले.
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढते आहे. अशा प्रकारचा गुन्हा घडू नये याची बॅकेच्या वतीने काळजी घेतली जात आहे. परंतु, गुन्हा घडलाच तर गुन्हेगार पकडण्यासाठी बॅक सायबर सिक्युरिटी अद्ययावत करीत आहे. राष्टीयीकृत बॅकेतून नागरीकांना मिळणाऱ्या सर्व सुविधा अर्बन बॅकेच्या सभासदांना मिळाव्यात यासाठी बॅकेने प्रयत्न केले होते. या प्रयत्नांना यश आले असून लवकरच बॅक सभासदांना जनधन योजना लागू करून तसेच शासनाचे अनुदान थेट खात्यावर जमा होणार आहेत.
शासनाच्या योजनांना बॅक थेट जोडली जाणार आहे, ही सभासदांच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे, अशीही माहिती कुंभारदरे यांनी दिली. या वेळी बॅकेचे उपाध्यक्ष सी. डी. बावळेकर, मुख्य व्यवस्थापक बाळकृष्ण साळुंखे, शाखाधिकारी फकिर वलगे, बॅंकेचे माजी अध्यक्ष दत्ताजी वाडकर, बाळकृष्ण कोंढाळकर, वृषाली डोईफोडे आदी मान्यवरांसह संचालक मंडळ उपस्थित होते.