कराड – कराडच्या पोलीस वसाहतीत गत काही दिवसांपासून चिठ्ठी सत्र सुरू आहे. यासाठी येथील महिलांच्या चपलाही रोमियोने सोडल्या नाहीत. त्यामुळे तो “पोस्टमन’ प्रेमी कोण? याचीच चर्चा चांगलीच रंगली आहे. अखेर शनिवारी सकाळी याचा उलगडा झाला. चिठ्ठी पाठविणारा अलगद जाळ्यात सापडला. आणि “खाकी’तल्या या पोस्टमन रोमियोला वसाहतीतच शिव्यांची लाखोली वाहत यथेच्छ “भडंग’ मिळाली.
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडच्या पोलिसांना सुरक्षित आणि अत्यंत चांगल्या वसाहतीची निर्मिती करून दिली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनाही हक्काचा निवारा मिळाला आहे.
या वसाहतीत विविध फ्लॅटमध्ये अनेक पोलीस कुटूंबीय वास्तव्यास आहेत. सुख-दु:खातही पोलीस कुटूंबे एकमेकांच्या मदतीला धावून येतात. मात्र, गत काही दिवसांपासून या पोलीस वसाहतीमधील महिलांमध्ये अस्वस्थता पसरली होती. येथे स्मार्ट मोबाईलच्या जमान्यात चिठ्ठ्या यायला लागल्या होत्या. त्याचे प्रमाण वाढल्याने महिलांमध्ये कमालीची भिती निर्माण झाली होती.
स्मार्ट फोनच्या जमान्यात “चिठ्ठी’ची कमालच झाली. पण तो “पोस्टमन’ भलताच हुशार होता. मोबाईल नंबरची मागणी तो चिठ्ठीने करायचा. घरात नव्हे तर घराबाहेर काढलेल्या महिलांच्या चपलांमध्ये या चिठ्ठ्या सापडू लागल्या आहेत. त्यामुळे चिठ्ठ्यांच्या भितीने वसाहतीमधील महिला घाबरू लागल्या आहेत.
ज्यांना या चिठ्ठ्या सापडल्या त्या महिलांनी कुटूंबात याची कल्पना दिली. काही दिवसांपासून याबाबत वसाहतीत चर्चा सुरू होती. हा नेमका काय प्रकार आहे. कोणीतरी खोडसाळपणा करीत असेल अशा पद्धतीचा सुरुवातीच्या काही दिवसात कयास बांधण्यात आला. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, दिवसेंदिवस हा प्रकार वाढत राहिला आणि वसाहतीमधील कुटूंबांना संताप अनावर झाला.
या पोस्टमनला शोधालाच पाहिजे असा चंग बांधला. शेवटी ते पोलिसच तपास चोखच करणार. एकाने घराच्या पोर्चमध्ये कोणालाही माहिती न होता कॅमेरा बसविला आणि अखेर तो “चिठ्ठीरोमियो’ अलगद सापडला.
शनिवारी सकाळी या प्रकाराने वसाहतीत भलताच गोंधळ उडाला. चपलांमध्ये चिठ्ठी ठेवणाऱ्याला अनेकांनी चांगलेच फैलावर घेत त्याला चांगलाच चोप दिला. सुरूवातीला “तो मी नव्हेच’ असे म्हणणाऱ्या त्या पोस्टमन रोमियोला पळताभुई थोडी झाली.
याबाबत पिडीत कुटूंबे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याच्या तयारीत होते. मात्र, याविषयी तक्रार करायला नको असा सल्ला संबंधितांना दिला जात असल्याचे समजते. त्यामुळे त्या खात्यातील “चिठ्ठी रोमियो’ वर कारवाई होणार का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.