वाई -वाई येथे नगरसेविकेसह कुटुंबातील आठ जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार वाई शहर व तालुक्यात नवे 19 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 236 झाली आहे.
वाई पोलिस ठाण्यातील 17 पोलिसांना व नातेवाईकांना करोनाचा संसर्ग झाल्याने शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. वाईत शुक्रवारी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार वाई तालुक्यात करोनाबाधितांचा आकडा दोनशे पार गेला आहे. आजपर्यंत वाई तालुक्यात 236 लोकांना करोनाची लागण झाली आहे. 107 लोकांवर उपचार सुरू असून 120 लोकांनी करोनावर मात केली आहे. तर नऊ लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
वाई पोलीस ठाण्याचा कारभार पूर्ववत सुरु करण्यात आला असून नागरिकांनी आपल्या तक्रारी वाई पोलीस ठाण्यातच देण्यात याव्यात, असे वाई पोलीस ठाण्याच्या वतीने सांगण्यात आले. नावेचीवाडी, वाई येथील नगरसेविकेला व त्यांच्या कुटुंबातील सात सदस्यांना करोनाची लागण झाली असून यामुळे शहरात खळबळ माजली आहे. नगरसेविका व राजकीय पदाधिकारी असलेले त्यांचे पती करोनाच्या लढाईत सक्रिय होते. प्रथम त्यांचे 72 वर्षीय सासरे बाधित झाले. नंतर प्रशासनाने खबरदारी म्हणून कुटुंबातील सर्व सदस्यांच्या स्त्रावाचे नमुने तपासणी केली असता नगरसेविका व त्यांच्या पतीसह सासू (वय 60), दीर (वय 34), भावजय (वय 30) व दोन मुलांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.
वाई तालुक्यात शनिवारी सकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये 19 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये भुईंज येथील 53 वर्षीय पुरुष, वाई येथील 37, 41 वर्षीय महिला, वाईच्या ब्राम्हणशाहीतील 45, 20, 48, 75, 40, 40 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, सोनगीरवाडी येथील 41 वर्षीय पुरुष, यशवंतनगर येथे 22, 8, 11, 6, 22 वर्षीय पुरुष व 20, 32, 9 वर्षीय महिला यांना करोनाचा संसर्ग झाल्याने तालुक्याचा आकडा 236 वर गेला. दरम्यान, वाई शहरात शुक्रवारपासून दि. 17 ते 26 पर्यंत अधिक कडक लॉकडाऊन सुरू असून नागरिकांनी नियमांचे कडक पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.