नेते, पदाधिकाऱ्यांचा हव्यास बेततोय अधिकाऱ्यांच्या जिवावर
पिंपरी, दि. 22 (प्रतिनिधी) – “करोना’च्या महामारीने जगभर हाहाकार उडविला आहे. पिंपरी-चिंचवड शहरही या महामारीच्या विळख्यात अडकले असताना महापालिकेत मात्र दुर्दैवी अन् लाजीरवाणा प्रकार सातत्याने घडत आहे. पालिकेतील सत्ताधारी आपल्या बगलबच्च्यांच्या माध्यमातून करोनाच्या टाळूवरचे “लोणी’ ओरबडण्याठी जो प्रकार करत आहेत त्यातून माणुसकीचाच “कडेलोट’ होत असल्याचे पहावयास मिळत आहे. दोन वेळच्या अन्नासाठी गोरगरिबांची एका बाजूला सुरू असलेली “तडफड’ आणि दुसऱ्या बाजूला करोडोंचे धनी असलेल्यांनी ठेके मिळविण्यासाठी चालविलेला “आटापिटा’ सर्वांनाच विचार करायला भाग पाडत असल्याचे चित्र महापालिका वर्तुळात पहावयास मिळत आहे.
गेल्या महिना सव्वा महिन्यापासून शहरात करोनाच्या विषाणूने सर्वांना घरात बसायला भाग पाडले आहे. संपूर्ण शहर सध्या निःशब्द बनले आहे. करोडोंची उलाढाल ठप्प झाली आहे. हातावरचे पोट असलेल्यांना जगायचे कसे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. परप्रांतीयांची आपल्या मूळ गावी जाण्यासाठी सुरू असलेली धडपड, पगार मिळेल की नाही या विवंचनेत असलेला कामगार वर्ग, झोपडपट्टीतील नागरिकांची सुरू असलेली घालमेल तर या महामारीपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी नागरिकांची सुरू असलेली ओढाताण असे चित्र शहरात पहावयास मिळत आहे.
एका बाजूला बंद असलेल्या सर्वच उलाढालीमुळे भविष्यात काय वाढून ठेवले आहे? याची चिंता सर्वांनाच सतावत असताना महापालिकेत मात्र या करोनाच्या महामारीचाही स्वत:साठी फायदा उठविण्याची स्पर्धा रंगली आहे. काही आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक आणि ठेकेदारांची साखळी करून अधिकाऱ्यांवर दबाव आणून खरेदी करण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे वस्तू मिळत नसल्याचे सांगत “चार आण्याची वस्तू बारा आण्याला’ असाही प्रकार सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. महापालिकेने चालविलेल्या प्रत्येक खरेदीत सुरू असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे अधिकारीही वैतागल्याचे खासगीत बोलत आहेत.
एका माजी पदाधिकाऱ्याने आपल्या बगलबच्च्यांना एक टेंडर मिळविण्यासाठी चार दिवसांपूर्वी कहर करत सर्व ठेकेदारांना या निविदा प्रक्रियेपासून दूर ठेवले. तर सध्या मास्कच्या खरेदीवरून चिंचवड मतदारसंघातील काही ठराविक नगरसेवकांनी हात धुऊन घेण्याचा सपाटा चालविला आहे. ही खरेदी बचत गटांच्या नावाखाली होणार असून, त्याद्वारे आपले उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी एक माजी पदाधिकारी अधिकाऱ्यांवर आयुक्तांमार्फत दबाव आणत असल्याची चर्चा रंगली आहे. एकहाती सत्ता असल्याने “हम करे सो कायदा’ असाच काहीसा प्रकार सुरू आहे. गब्बर आणि निगरगठ्ठ झालेले पदाधिकारी कोणालाच घाबरत नसल्याचे चित्र असले तरी किमान महामारीचा प्रसंग लक्षात घेऊन तरी कसे वागले पाहिजे हे पदाधिकारी स्वत:च्या आंतरात्म्याला तरी विचारतील का? हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.
टक्केवारीतून गलेलठ्ठ बनलेल्या पदाधिकाऱ्यांनी किमान विशेष बाब म्हणजे करोनाच्या महामारीसाठी अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी स्थायी समिती आयुक्तांना अधिकार दिल्याचे सांगत आहे तर दुसऱ्या बाजूला भाजपाचेच पदाधिकारी आयुक्तांवर दबाव आणून “स्वार्थ’ साधत असल्याचे समोर येत आहे. करोनाच्या नावाखाली सुरू असलेली खरेदी, त्यासाठी राबविलेली खरेदी प्रक्रिया, ठेकेदारांची नावे आणि त्यांना दिलेल्या कामांची पद्धत महापालिकेने जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून होत आहे.
अधिकारी रुग्णालयात
महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरील आयुक्तांच्या कक्षात मंगळवारी दुपारी भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व काही वरिष्ठ पातळीवरील व्यक्तींच्या उपस्थितीत करोना संदर्भात बैठक झाली होती. या बैठकीत बऱ्याच गोष्टींवरून शाब्दीक राडा झाल्याचे समजते. ही बैठक संपताच एका अधिकाऱ्याने इतका दबाव घेतला की संबंधिताला थेट रुग्णालयात दाखल करावे लागले. विशेष म्हणजे महापालिकेत हा अधिकारी चालत जाण्याच्या अवस्थेतही नव्हता. त्याला “व्हिल चेअर’वरून घेऊन जावे लागल्याने या बैठकीत नेमके कोणते “रामायण’ घडले याची खमंग चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.
“गब्बर’ तरीही हव्यास
महापालिकेत कार्यरत असलेले अनेक पदाधिकारी हे कोट्यवधींचे धनी आहेत. पिढ्यान पिढ्या बसून खातील अशी परिस्थिती असतानाही सध्या सुरू असलेला पैशांचा हव्यास सर्वांनाच आश्चर्य व्यक्त करायला लावणारा आहे. “करोना’सारख्या भीषण परिस्थितीला देखील ते काळ्या कमाईचे साधन बनवित आहेत. करोनासारख्या महामारीमध्ये टाळूवरील लोणी खाऊन किमान पापाचे धनी तरी होऊ नका, अशी माफक अपेक्षा शहरवासियांमधून व्यक्त होत आहे.