येरवडा (प्रतिनिधी): कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षतेबाबत भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स, शिवसेना प्रभाग क्रमांक २ आणि श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी डॉक्टर आपल्या दारी आरोग्य विषयक अभियान सुरू झाले होते.
कठीण प्रसंगी समाजासाठी काही तरी केलं पाहिजे म्हणून ४ सहकाऱ्यांसोबत प्रभाग क्रमांक २ मधील जाधवनगर, कामगारनगर, माजी सैनिक नगर, श्रमिक वसाहत, पंचशील नगर, एकतानगर भागात मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य विषयक अभियानाचा समारोप विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी आणि एसआरपीएफचे जवान यांची आरोग्य तपासणी मुकुंदराव आंबेडकर चौक, विश्रांतवाडी येथे घेऊन करण्यात आला. अशी माहिती शिवसेना माजी उपशहर प्रमुख तथा पुणे माजी नगरसेवक सागर माळकर यांनी दिली आहे.
सदर आरोग्य तपासणी विश्रांतवाडी चौक येथे डॉ.संतोष संगोळे, डॉ.प्रमोद लिंगसे, डॉ.प्रमोद सातपुते, डॉ.आनंद पालीमकर यांच्या मार्फत करण्यात आली, आणि नागरिकांना कोरोना विषाणू संदर्भात मार्गदर्शन केले.
डॉक्टर आपल्या दारी या अभियानासाठी शिवसेना उपशहर प्रमुख व नगरसेवक सागर माळकर यांनी पुढाकार घेतला होता. त्याबरोबर सोशल डिस्टंटींगसहित शासनाच्या इतर नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले होते. विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड, पोलीस निरीक्षक(गुन्हे) राजेंद्र कदम साहेब, एपीआय यादव यांच्या उपस्थितीत सदर अभियान पार पडले. या अभियानाला जयवंत पास्ते, अक्षय माळकर, उपविभाग प्रमुख शकील सावंत, शाखा प्रमुख इंद्रजित कांबळे, रियाझ शेख यांनी विशेष सहकार्य केले आहे.